- निकृष्ट बियाणे वितरित केल्याचा आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे वाटप केल्याचा आरोप करत आज बेळगावातील संयुक्त कृषी संचालक कार्यालयासमोर नेगिलोयोगी शेतकरी संघातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. आज बेळगावातील संयुक्त कृषी संचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर नेगिलोयोगी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते रवी पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “सरकारने वाटप केलेले सोयाबीन बियाणे काही ठिकाणी पेरणीनंतरही योग्य प्रकारे उगवत नाहीये. अधिकारी पुन्हा बियाणे देण्याचे आश्वासन देत असले तरी, वारंवार पेरणी केल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे आणि त्यांना त्रास होत आहे.” पाटील यांनी पुढे म्हटले की, “पीक आल्यानंतरही योग्य आधारभूत किंमत दिली जात नाही आणि शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. कृषी मंत्र्यांनी अनुभवी शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य आधारभूत किंमत द्यावी. लोकप्रतिनिधी येईपर्यंत कृषी अधिकारी बियाणे वाटप करत नाहीत, -असा आरोपही त्यांनी केला.” यावेळी नेगिलोयोगी शेतकरी संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.