बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावसाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत
आज बैठक झाली तसेच जागेची पाहणी करण्यात आली.

बेळगावमध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामासाठी सरकारने यापूर्वीच ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंडलगा येथे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आदींच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आली.

तत्पूर्वी, त्यांनी विद्यमान तहसीलदार कार्यालय, सब रजिस्टर ऑफिस आणि सीईएन गुन्हे पोलिस ठाण्याच्या इमारतीची पाहणी केली. नंतर त्यांनी हिंडलगा परिसरात घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी माहिती देताना ग्रामीणच्या आमदार तथा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव शहराच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे.

यासाठी सुवर्णसौधजवळ, कणबर्गी आणि हिंडलगा या तीन ठिकाणी जागा निवडण्यात आली होती. मात्र, हिंडलगा परिसर शहराजवळ असल्याने ही जागा अधिक योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवरच नवी इमारत बांधण्याचा विचार होता, मात्र ऐतिहासिक इमारती पाडल्यास वाद निर्माण होऊ शकतो, तसेच शहरातील गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र जागेत जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.