• चन्नम्मा चौकात निदर्शने ; दोषींना तात्काळ अटक करण्याची केली मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात बांधकाम सुरू असलेल्या मशिदीच्या तळमजल्यावरील पवित्र कुराणाची चोरी करून ते जाळण्याचा निंदनीय प्रकार घडला. नमाज अदा केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यावर ते जाळल्याचे आढळून आले. या घटनेनंतर सोमवारी सायंकाळी शहरातील चन्नम्मा सर्कलमध्ये मुस्लिम समाजातील हजारो लोकांनी निदर्शने करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आपला संताप व्यक्त केला.

यावेळी बेळगावचे पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी घटनास्थळी भेट देऊन कुराण जाळण्याच्या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याची चौकशी करून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे सांगून मुस्लिम समुदायाला निदर्शने मागे घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी स्थानिक आमदार आसिफ राजू सेठ म्हणाले की, मुस्लिम समुदायाचे सदस्य शांततेत निदर्शने करत आहेत. या घटनेबाबत पोलिस आयुक्त कारवाई करतील. त्यांनी दोषींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. 

या निदर्शनात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.