बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेकडून ३ टक्के वाढीव घरपट्टी आकारणी सुरू केली आहे. ३ टक्के वाढीव दरानेच शहरातील मिळकतींचे घरपट्टीचे चलन दिले जात असल्याची माहिती महसूल विभागातून दिली आहे. ३ टक्के घरपट्टी वाढविण्याचा निर्णय ५ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेतला होता. पण त्या बैठकीचे इतिवृत्त पुढील म्हणजे ३ मे रोजीच्या बैठकीत मंजूर झाल्यावरच वाढीव घरपट्टी आकारणी सुरू होईल, अशी शक्यता होती. मात्र इतिवृत्त झाल्यावर मंजूर होण्याआधीच वाढीव घरपट्टीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. बैठकीत निर्णय लगेचच घरपट्टीच्या सेमीनल या संगणकीय प्रणालीत अपडेट केल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. अपडेट झाल्यावर ज्या मिळकतधारकांना चलन वितरण केले. त्यात वाढीव घरपट्टीचा समावेश आहे. त्याआधी ज्यांनी घरपट्टी भरली आहे ; त्यांच्याकडून पुढील आर्थिक वर्षात ही वाढीव घरपट्टी आकारणी केली जाणार असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेकडून घरपट्टीत वाढ केल्याने बेळगावकरांवरील आर्थिक बोजा वाढला आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या सर्वसाधारण बैठकीत महापालिकेने ३ टक्के घरपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला होता. शोभा सोमणाचे यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली होती; पण त्या घरपट्टी वाढविण्याच्या निर्णयावरून महापालिकेत वाद उद्भवला होता. त्या बैठकीचे इतिवृत्त गायब झाल्याने ते प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. त्या वादामुळे ३ टक्के वाढीव घरपट्टी आकारणीला विलंब झाला होता. १ एप्रिल २०२४ पासून ही ३ टक्के वाढीव घरपट्टी आकारणी सुरू झाली होती. आता चालू आर्थिक वर्षात घरपट्टीत आणखी ३ टक्के वाढ झाली आहे. शिवाय ऑक्टोबर २०२४ मध्ये शहरातील ज्या विभागातील रेडरिकनरचे दर वाढले आहेत, त्या विभाग मिळकतींची घरपट्टी आणखी वाढली आहे.