• क्वॉलिफायर २ मध्ये धडक ; गुजरात टायटन्सचे आव्हान संपुष्टात

चंडीगढ : आयपीएल 2025 मध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यासह गुजरात टायटन्सचा प्रवास संपला आहे. तर पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाबशी भिडणार आहे.

  • रोहित शर्माचा ‘हिटमॅन’ शो !

पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम तुफानी झाली. रोहित शर्मा आणि त्याचा नवीन सलामीवीर जोडीदार जॉनी बेअरस्टो यांनी जीटी गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. पॉवरप्लेमध्ये हिटमॅनला दोन जीवदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोघांनी मिळून पहिल्या 6 षटकात 79 धावा केल्या. पण साई किशोरने ही जोडी फोडली. 22 चेंडूत 47 धावा काढून बेअरस्टो आऊट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव संघाच्या माजी कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी क्रीजवर आला.

रोहितने वादळी खेळी खेळली आणि 50 चेंडूत 81 धावा केल्या. या धमाकेदार खेळीदरम्यान रोहितने दोन मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. खरं तर, हिटमन आता आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. याशिवाय, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7000 धावांचा टप्पाही ओलांडला.

त्याच वेळी, सूर्यकुमारने 33 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये, तिलक वर्मा (25) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (22) यांनी काही शानदार शॉट्स खेळले. अशा प्रकारे, मुंबईने संपूर्ण षटक खेळल्यानंतर 5 विकेट गमावून 228 धावा केल्या.

  • कर्णधार शुभम गिल फेल :

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खुपच खराब झाली आणि पहिल्याच षटकात कर्णधार शुभम गिल (1) ची विकेट पडली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर शुभम एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि कुशल मेंडिस यांनी 64 धावांची भागीदारी करत डावाची सूत्रे हाती घेतली. 20 धावा काढल्यानंतर मिशेल सँटनरच्या चेंडूवर कुशल मेंडिस हिटविकेटवर आऊट झाला.

  • साई सुदर्शनची जबरदस्त बॅटिंग : 

येथून साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे गुजरात टायटन्स पुन्हा सामन्यात परतले. पण सुंदर-सुदर्शनची भागीदारी जसप्रीत बुमराहने मोडली. वॉशिंग्टन सुंदर 48 धावा केल्यानंतर जसप्रीत बुमराहने बाद झाला. सुंदरने 24 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यानंतर साई सुदर्शन पण वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनच्या चेंडूवर आऊट झाला. सुदर्शनने 49 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 80 धावा केल्या.