- आशा कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य संयुक्त आशा कामगार संघटनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना १० हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या हंदिगनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आठवण करून देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एप्रिल महिन्यापासून आशा सेविकांना १० हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने राजधानी बेंगळुरूमध्ये आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. आता सरकारने केवळ एक हजार रुपये वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. बहुसंख्य आशा सेविका विधवा किंवा गरीब महिला आहेत, ज्या माता आणि बालकांची काळजी घेण्याचे महत्त्वाचे काम करतात. तरीही सरकार त्यांना १० हजार रुपये मानधन देत नाही, हे दुर्दैवी आहे. तीन महिन्यांत केवळ ५,००० रुपये मानधन मिळाल्यास जीवन कसे जगायचे? असा सवाल आशा कार्यकर्ती महादेवी कुऱ्याण्णवर यांनी उपस्थित केला.
यावेळी अॅड. राजीव, हेमा हावळ, अनुपमा शिवणगेकर, लक्ष्मी कोचेरी यांच्यासह हंदिगनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.