बेळगाव / प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारल्याचा निषेध नोंदवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत, त्यांचा फोटो असलेल्या पोस्टरला आग लावून निषेध नोंदविण्यात आला.

या निषेधानंतर चन्नम्मा चौकापासुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी “जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे,” अशी मागणी केली. मात्र, यावेळी काही कार्यकर्त्यांनी गेटवर चढून कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांनी रोखले.

याप्रसंगी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत, आमचा आवाज ऐका, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून अभाविप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचा निषेध करत, प्रशासकीय यंत्रणेच्या सन्मानासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले.

या आंदोलनात अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.