बेळगाव / प्रतिनिधी

महागडा मोबाईल कशासाठी खरेदी केलास अशी विचारणा वडिलांनी केल्याने दुखावलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बेळगावात घडली आहे. वैभव नगर येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुण रशीद शेखने त्याच्या वडिलांशी महागड्या आयफोन खरेदीवरून झालेल्या वादातून आत्महत्या केली. एपीएमसी पोलिसात त्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशीदने अलीकडेच ७०,००० रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला होता, ज्यामुळे त्याचे त्याच्या वडिलांशी मतभेद झाले. मोठ्या खर्चाबद्दल चिंतेत असलेल्या त्याच्या वडिलांनी इतक्या महागड्या खरेदीची गरज का आहे असा प्रश्न उपस्थित केला. या वादामुळे नाराज होऊन रशीदने हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले. रमजान ईदच्या पवित्र सणाच्या नंतर लगेचच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईल सारख्या महागड्या वस्तूंकडे तरुणांचा कल वाढला आहे. त्यामधूनच अनर्थ घडत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.