• जॅमर समस्येसंदर्भात कारागृह अधीक्षकांशी केली चर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसवलेल्या जॅमरमुळे परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि बँक कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने कारागृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसवलेले नेटवर्क जॅमर परिसरातील मोबाईल नेटवर्कवर परिणाम करत असल्याने ग्रामस्थांनी यासंबंधी तक्रारी केल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, बँक कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांना अडचणी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी कारागृहाला भेट देऊन कारागृह अधीक्षकांशी चर्चा केली. जॅमरच्या कार्यक्षेत्राचा परिणाम परिसरातील रहिवाशांवर होऊ नये यासाठी त्याचा प्रभाव कमी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कारागृहातील सुरक्षेसाठी जॅमर आवश्यक असला तरी त्यामुळे स्थानिक नागरिकांना अडथळे येऊ नयेत, यासाठी योग्य तो तोडगा काढण्याची गरज असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.