बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव स्मार्ट सिटीच्या कचऱ्याची विल्हेवाट तालुक्यातील तुरमुरी कचरा डेपोमध्ये लावली जाते. हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, बेळगाव गुड्सशेड रोडवर आणखी एक कचरा डेपो समोर आला असून नागरिकांतून महापालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला गुड्सशेड रोडवर आता कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे .जनतेला अद्याप याची माहिती नाही. मात्र शहरातील विविध भागातून जमा झालेला कचरा येथे आणून टाकला जात असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. तसेच पाऊस व उन्हात हा कचरा रस्त्याच्या मधोमध येऊन पडल्याने स्थानिकांना रोगराईची भीती भेडसावत आहे. अनेकवेळा महापालिकेच्या निदर्शनास आणून देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
महापालिकेने शहरातील प्रवेशद्वारांवर कचऱ्याची विल्हेवाट लावू नये. त्यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना पेच निर्माण होणार असल्याचे बैठक घेऊन सांगण्यात आले. मात्र, शहराच्या मध्यभागी कचरा विल्हेवाटीचे युनिट होत असतानाही याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.