खानापूर / प्रतिनिधी

म्हादाई प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. याखेरीज संपूर्ण खानापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याशिवाय अन्य कारणास्तव म्हादाई वळण प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींसह खानापूर तालुक्यातील समस्त जनतेने संपूर्ण विरोध दर्शवला असून हा प्रकल्प तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज बुधवारी उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

म्हादाई नदी कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास खानापूर तालुक्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे म्हादाई प्रकल्पाच्या विरोधात ‘खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकऱ्यांना वाचवा’ या शीर्षकाखाली आज बुधवारी खानापूर बस स्थानकाजवळील वागळे कॉलेज सभागृहात पर्यावरण प्रेमी आणि तालुक्यातील जनतेची बैठक पार पडली.

आजच्या बैठकीस दिलीप कामत, शिवाजी कागणीकर, कॅ. नितीन धोंड, ॲड. एन. आर. लातूर, जगदीश होसमणी, मल्लिकार्जुन माळी, सिद्धगौडा मोदगी, श्रीमती शारदा गोपाळ, गीता साहू, काशिनाथ नाईक, शंकरांना लंगटी, बसनगौडा पाटील, विल्सन कार्यालो आदींसह बहुसंख्य पर्यावरणप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.