• अधिकाऱ्यांना केल्या स्वच्छता व समस्या सोडविण्याच्या सूचना

वडगाव ता. २६ : आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. नाल्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे नाल्यात कचरा व दुर्गंधी युक्त पाणी तुंबून राहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, दुर्गंधीत पाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरातील विहिरीमध्ये सुद्धा नाल्याचे पाणी झिरपत आहे त्यामुळे विहिरींचे पाणीसुद्धा दूषित झाले आहे. अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती याची दखल घेत. बेळगावचे महापौर मंगेश पवार यांनी आनंदनगर परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांच्या समवेत या भागाच्या नगरसेविका सारिका पाटील उपस्थित होत्या.

नगरसेविका सारिका पाटील यांनीही आनंदनगर परिसरातील विविध समस्या महापौरांच्या समोर कथन केल्या. स्थानिक रहिवासी व समाजसेवक मल्लाप्पा कुंडेकर यांनीही आनंद नगर दुसऱ्या क्रॉस मधील रहिवाशांच्या विविध समस्या महापौरासमोर मांडल्या. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी नाल्यामध्ये वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी उघड्या करून स्वच्छ कराव्यात. तसेच परिसरात साचलेल्या कचऱ्याची सुद्धा ताबडतोब उचल करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर अनगोळ मुख्य रस्त्यावर ड्रेनेज पाईप लाईन घालण्यात आली आहे. पण पाईप कमी जाडीची असल्यामुळे उर्वरित पाणी आनंदनगर परिसरातील नाल्यातून वाहत आहे, तेही पाणी लवकरच बंद करण्यात येईल, त्याचबरोबर एक-दोन दिवसात संपूर्ण नाल्याची स्वच्छताही करण्यात येईल असे आश्वासन सहिवाशांना दिले. यावेळी नगरसेविका सारिका पाटील, सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा कुंडेकर, राजाराम निलजकर, प्रा. सि. एम. गोरल, मुत्तापा गंजाळ, शिवाजी मुचंडी, आदी यावेळी उपस्थित होते.