बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली मार्केट पोलीस स्थानकात दलित निवारण समितीच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विविध दलित संघटनांचे नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित संघटनांनी मुलींच्या वसतिगृहावर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली. तसेच दलित वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक नोंदणी न करता भोजन मिळत नसल्याच्या समस्याही मांडण्यात आल्या.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त ईडा मार्टिन हे होते. यावेळी त्यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि त्यावर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. डीसीपी रोहन जगदीश यांनी देखील तरुणांना योग्य संधी मिळावी आणि अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे खटले दाखल होऊ नयेत, यासाठी समाजातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पोलिस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग यांचा दलित संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी एसीपी संतोष सत्यनायक, सीपीआय काली मिर्ची, आवटी , सिमानी, तसेच दलित नेते मल्लेश चौगुले, बसवराज रायगौळ, बाबू पूजारी, नगरसेवक सिद्रामय्या मेत्री, भाविकांना बंग्यागोळ आदी मान्यवर उपस्थित होते.