बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याच्या वतीने मराठा उद्योजकांसाठी माईंड पॉवर सेमिनार आयोजित केले होते.सुप्रसिध्द माईंड ट्रेनर विनोद कुराडे, माईंड ट्रेनर व मोटिवेशनल (कोल्हापूर) हे वक्ते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून (महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील, यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन आणि शिवपूजनाने करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे व वक्त्याचे स्वागत करण्यात आले. मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याचे अध्यक्ष किरण मारुती धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. मराठा समाजातील व्यक्तिंनी मराठा समाजातील व्यक्तिंकडूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजे कोणीही डी – मार्ट, ऑनलाईन वस्तू खरेदी करु नये असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले.
प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले महादेव पाटील म्हणाले, आजची युवा पिढी ही भरकटत चालली आहे त्यांना योग्य दिशा दाखविने गरजेचे आहे, यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर म्हणाले मराठा समाजातील व्यक्तिंनी नोकरी न करता नवनवीन उद्योग धंद्याकडे वळले पाहिजे तरच आपला मराठा समाज पुढे जाईल.
यानंतर विनोद कुराडे यांनी उद्योग कसे यशस्वी करावे याबद्दल माहिती दिली. व्यवसाय वाढीसाठी माईंड पॉवरचा वापर कसा करावा हे त्यांनी सांगितले. आपले ग्राहक टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल सांगितले, बहिर्मन, अंतरमन व विश्वमनाचे आपल्या जीवनातील महत्व याबद्दल माहिती दिली.
मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याचे सचिव मनोहर घाडी यांनी सुत्रसंचलन केले व मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याचे उपाध्यक्ष नारायण सांगावकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी भरतेश पाटील, विलास घाडी, भूषण कंग्राळकर, धाकलु करविनकोप, जोतिबा हुरुडे, महादेव मुतगेकर, कु. शिवानी धामणेकर, शिवमती सरस्वती शिंदोळकर, मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याचे कार्यकारी आणि मराठा समाज बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.