• प्रशिक्षण प्राप्त ६५९ अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ

बेळगाव / प्रतिनिधी

देश सेवा करण्याकरिता लष्करात भरती होण्यासाठी बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांच्या ५ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिस्तबद्धरीत्या मोठ्या दिमाखात पार पडला. सदर दीक्षांत सोहळ्याच्या प्रारंभी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या परेड ग्राउंडवर संपूर्ण लष्करी परंपरांसह अग्निविरांच्या एका औपचारिक शानदार परेड अर्थात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठा सेंटर येथे ३१ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एकूण ६५९ अग्निवीरांना आज साक्षांकित करण्यात आले. पथसंचालनानंतर प्रमुख पाहुणे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांच्या साक्षांकन परेडचे पुनरावलोकन केले. त्यांनी अग्निवीरांच्या निष्कलंक कामगिरी आणि कवायतीच्या उच्च दर्जाबद्दल त्यांचे कौतुक केले. परेडचे नेतृत्व अग्निवीर गजानन राठोड यांनी केले तर लेफ्टनंट कर्नल दिग्विजय सिंह परेड अॅडज्युटंट होते. परेडपुनरावलोकनानंतर अग्निवीरांनी आपला राष्ट्रध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि धार्मिक पवित्र ग्रंथांच्या साक्षीने आपल्या कर्तव्याची, देश संरक्षणाची शपथ घेतली. याप्रसंगी अग्निवीरांचे पालक, रेजिमेंटचे सेवारत आणि निवृत्त बंधूभगिनी, बेळगावातील मान्यवर मंडळी, एनसीसीचे छात्र आणि विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्रभावी सोहळ्याला साक्षीदार म्हणून उपस्थिती लावली होती. अग्निवीरांनी ज्या अभिमानाने शपथ घेतली, त्यामुळे सोहळा आणखीच प्रभावी झाला होता.

याप्रसंगी लष्करात नव्याने दाखल झालेल्या अग्निवीरांना संबोधति करताना प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी उपस्थित देश सेवेसाठी सज्ज झालेल्या अग्निविरांना भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या पायदळ रेजिमेंटपैकी एक असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या समृद्ध वारशाची आणि वैभवाची आठवण करून दिली. सैनिकांच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व यावरही त्यांनी भर दिला. यानंतर ब्रिगेडियर मुखर्जी यांच्या हस्ते प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत अग्निवीरांना पदके प्रदान करून गौरवण्यात आले. अग्निवीर कपिल कृष्णत यांना सर्वकष सर्वोत्तम अग्निवीर म्हणून नाईक यशवंत घाडगे विजय क्रॉस मेडलफ प्रदान करण्यात आले.

अखेर प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि अग्निवीरांनी शरकत युद्ध स्मारकाच्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून रेजिमेंटच्या शूरवीरांना आदरांजली वाहिल्यानंतर दीक्षांत सोहळ्याचा समारोप झाला. यावेळी उपस्थित अभिमानी पालकांना त्यांनी त्यांच्या पाल्यांना देशसेवा करण्यास प्रेरित केल्याबद्दल गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आले.