बेळगाव / प्रतिनिधी

महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार अपघातास कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रक चालकाला कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. मधुकर कोंडीराम सोमवंशी (वय ६५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील रहिवासी आहे. बेंगळुरू येथे विधिमंडळ पक्षाची बैठक आटोपून बेळगावला येत असताना कित्तूर तालुक्यातील अंबाडगट्टी गावात १४ जानेवारी रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीला दुखापत झाली होती.

या घटनेनंतर सदर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा कारचालक शिवप्रसाद यांनी कित्तूर पोलिस स्थानकात हिट – अँड – रनची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले पुरावे, ज्यामध्ये कारला धडक दिलेल्या ट्रकच्या रंगाचा समावेश होता, ती सर्व माहिती फॉरेन्सिक लॅबकडे पाठविली होती. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक शोधून काढला आणि चालकाला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.