बेळगाव / प्रतिनिधी

पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका तरुणाने दगडफेक केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडून चोप दिला आहे. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने मंदिरावर दगडफेक केली. ही गोष्ट लक्षात येतात स्थानिक नागरिकांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडून त्याला जाब विचारला. त्यानंतर त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री पांगुळ गल्ली परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

परिसरातील नागरिकांनी मध्यरात्री पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली. अशांतता माजविण्यासाठी मंदिरावर दगडफेक करणाऱ्या तरुणावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. परिसरातील तणाव लक्षात घेऊन भेंडीबाजार, पांगुळ गल्ली परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.