बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना फेडरेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून न्यायालय परिसरात पर्यावरण जागृती आणि मोफत रोपे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण करून मोफत रोपे वाटण्यात आली.

यावेळी वनसंवर्धन करून देश वाचवण्याकरिता , प्रत्येक घरासाठी एक झाड, प्रत्येक गावासाठी एक जंगल अशा घोषणा देण्यात आल्या. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बेळगाव चेअरमन डॉ. एस. बी. कुलकर्णी यांनी केले. 

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी सैनिक गणपत देसाई म्हणाले की, लोकांनी पावसाचे पाणी साठवावे आणि रोपे लावून त्यांचे संवर्धन करून आपल्या घराचे वातावरण स्वच्छ ठेवावे. जनतेला वाटण्यासाठी विविध प्रकारची ३०० रोपे आणली आहेत. त्यांनी ती घरी न्यावीत आणि त्यांचे संगोपन करून पर्यावरणाचे रक्षण करावे अशी विनंती त्यांनी केली.

या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. कुलकर्णी, विकास कलघटगी, व्यवस्थापकीय समिती सदस्य कर्नाटक राज्य शाखा बंगलोर, श्रीमती प्रिया पुराणिक माननीय कोषाध्यक्ष आणि माजी खजिनदार लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) श्रीमती विनोदिनी शर्मा यांच्यासह बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह वकील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.