- लाच स्वीकारताना दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात आज लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. अंगणवाडी सेविकांकडून लाच घेताना दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कार्यालयातील अधीक्षक अब्दुल वली आणि कॉम्प्युटर ऑपरेटर सौम्या (शशिकाला) बडीगेर यांनी हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका शकुंतला कांबळे यांच्याकडून अंगणवाडीच्या बदलीसाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. शकुंतला कांबळे यांनी याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, लोकायुक्तांच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, जेव्हा १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली जात होती, तेव्हा लोकायुक्तांचे निरीक्षक धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली आणि अब्दुल वली व सौम्या बडीगेर यांना रंगेहाथ पकडले.
लोकायुक्तांनी धाड टाकताच, कॉम्प्युटर ऑपरेटर सौम्या अस्वस्थ झाल्या. त्यांना तात्काळ कार्यालयातच डॉक्टरांना बोलावून उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू ठेवली. या कारवाईमुळे महिला व बाल कल्याण विभागात चाललेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला असून, प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.