बेळगाव / प्रतिनिधी
पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक मंदिरात घुसून केलेल्या हल्ल्यात आठजण जखमी झाले. बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात ही घटना घडली. जखमींमध्ये एका महिलेसह सहा पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सध्या बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील विठ्ठल मंदिरात सोमवारी सायंकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक मंदिरात घुसून ग्रामस्थांवर हल्ला केला. यामध्ये मल्लप्पा पाटील, मलप्रभा पाटील, नीलकंठ साकरें, विठ्ठल मांडेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ जखमी झाले. एका व्यक्तीच्या हाताच्या बोटांपासून ते कोपरापर्यंत कुत्र्याने चावा घेतला असून या हल्ल्यात आणखी सात जण जखमी झाले आहेत.
दरम्यान सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.