• धामणे गावातील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

क्षुल्लक कारणातून मोठ्या भावाने केलेल्या जबर मारहाणीत लहान भावाचा मृत्यू झाला. धामणे गावात बुधवारी सकाळी ११ वाजता ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली आहे.

दोघा भावांमध्ये यापूर्वीही व्यसनाधीनतेमुळे सातत्याने असे वाद झाले होते. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले असून आई दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. अशा परिस्थितीत दोन्ही भावंडांमध्ये झालेल्या वादावादीत एकाच मृत्यू झाल्याने अंध असलेल्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) असे मयत भावाचे नाव आहे, तर मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०) असे आरोपी भावाचे नाव आहे. हे दोघेही धामणे, बसवान गल्ली  येथे रहात होते. बुधवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून दोन्ही भावंडांमध्ये वाद निर्माण झाला. यादरम्यान मोठ्या भावाने लहान भावाला लोखंडी सळईने मारहाण करून ढकलून दिले. यावेळी लहान भाऊ लक्ष्मण बाळेकुंद्री घरातील कट्ट्यावर जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला.

दोन्ही भावांमध्ये कायम वाद व्हायचे यामुळे शेजारी राहणाऱ्यांनाही ही बाब नवी नव्हती. परंतु या घटनेने अत्यंत क्रूरपणाचे रूप घेत अखेर या वादाचे पर्यवसान एकाच्या जीवावर बेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपी मारुती याला ताब्यात घेतले आहे.