बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटुंनी महाराष्ट्रातील देवगड, विजयदुर्ग खाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या 8 व्या खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट करत घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेतील 17 वर्षावरील मुलांच्या गटासाठी असलेल्या 5 कि.मी. शर्यतीत आबा हिंद क्लब बेळगावच्या कुमार स्मरण मंगळूरकर यांने सुवर्ण पदक पटकाविले. 17 वर्षाखालील मुलाच्या 3 कि.मी. शर्यतीत प्रसाद सायनेकर याने सुवर्णपदक आणि मयुरेश जाधव याने रौप्य पदक संपादन केले. मुलांच्या 9 वर्षाखालील गटात कुमार हर्षवर्धन कर्लेकर याने 1 कि.मी. शर्यतीत रौप्य पदक मिळवले. पुरुषांच्या 51 वर्षावरील गटाच्या 2 कि.मी. शर्यतीत अरुण जाधव यांनी सुवर्ण पदक आणि मुकेश शिंदे यांनी रौप्य पदक पटकाविले.

मुलींच्या 17 वर्षाखालील गटात श्रेष्ठा रोटी हिने 3 कि.मी. शर्यतीत सुवर्ण पदक हस्तगत केले. मुलींच्या 15 वर्षाखालील गटात प्राजक्ता प्रभू हिने 3 कि.मी. शर्यतीत रौप्य पदक, तर 13 वर्षाखालील मुलींच्या गटात अनीका बर्डे हिने 2 कि.मी. शर्यतीत कांस्यपदक मिळवले. मुलींच्या 11 वर्षाखालील गटात निधी मुचंडी हिने 1 कि.मी. शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे प्रजीत मयेकर याने 3 कि.मी. आणि प्रनम्या प्रभू हिने 1 कि.मी. शर्यतीत सातवा क्रमांक मिळवला. या सर्व यशस्वी जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील व किशोर पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन, तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी व सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.