बेळगाव / प्रतिनिधी

स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या प्रतिभावान जलतरणपटू सुनिधी सुहास हलकरे आणि समृद्धी सुहास हलकरे यांची बिहारमधील गया येथे येत्या ५ ते ९ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स – २०२५ मध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. सुनिधी आणि समृद्धी यांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून या पद्धतीने कर्नाटक राज्य संघात स्थान मिळवले आहे. आता खेलो इंडिया युथ गेम्स – २०२५ मध्ये रवींद्रनाथ टागोर पीयू कॉलेजची विद्यार्थिनी सुनिधी हलकरे १०० मी. आणि २०० मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत, तर ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएसई हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी हलकरे २०० मी. आणि ४०० मी. फ्री स्टाईल शर्यतीमध्ये भाग घेईल.

यादोन्ही बहिणी बेळगाव येथील केएलईच्या जागतिक दर्जाच्या ऑलिंपिक आकाराच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये प्रशिक्षण घेतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांच्याकडून समर्पित तज्ज्ञ प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते. त्याचप्रमाणे दोघींनाही डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आणि मित्रांचा पाठिंबा व प्रोत्साहन लाभत आहे. त्यांचे मनापासून आभार मानतो. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्याद्वारे सुनिधी आणि समृद्धी यांनी कठोर परिश्रम, समर्पण आणि भक्कम पाठिंब्यामुळे मोठे यश मिळवता येते हे दाखवून दिले आहे.