- भूमी अभिलेख विभागातील लाचखोर सर्वेअरला अटक
- ४५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तहसील कार्यालयावर घालण्यात आलेल्या छाप्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा लोकायुक्त अधिकाऱ्यांनी खानापूर भूमी अभिलेख विभागातील सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातील एका सर्वेअरवर छापा टाकत त्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे खानापूरमधील शासकीय यंत्रणेत असलेल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, लोकायुक्तांची ही धडक कारवाई हा भ्रष्टाचाऱ्यांसाठी इशाऱ्याची घंटा ठरत आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील कुटिनो नगर क्षेत्रातील मन्सापूर गावचे रहिवासी सदाशिव कांबळे यांच्याकडून पी.टी.शीट तयार करून देण्यासाठी सर्वेअर विनोद संबन्नी यांनी रू. ४५०० /- लाच मागितली होती. सदाशिव कांबळे यांनी याच्याविरुद्ध बेळगाव लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त अधिकारी संगमेश होसमनी, रवीकुमार धर्मच्ची व अन्य लोकायुक्त पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.