खानापूर / प्रतिनिधी
पारिशवाड मार्गावर शांतिनिकेतन शाळे नजीक, कुप्पटगिरी क्रॉसजवळ दोन दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने एक १७ वर्षीय दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. सदर घटना आज सोमवार (दि. ५ मे) रोजी सकाळी ८. १५ वा. सुमारास घडली. संजय वैजनाथ येळ्ळूर (वय १७ वर्ष) (रा. मुळचा मुन्नोळी सध्या राहणार देवलत्ती) असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर विठ्ठल नारायण महाजन (वय ३० वर्ष) (रा. नागुर्डा) असे अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवलत्ती येथील संजय वैजनाथ येळ्ळूर या युवकाचे वडील लहानपणीच वारल्याने तो त्याच्या मामाच्या गावी देवलत्ती येथेच रहायचा. सदर युवक नंदगड येथील पदवीपूर्व विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. आज सोमवारी सकाळी आपल्या मित्राला आणण्यासाठी खानापूरकडे जात असताना त्याच्या दुचाकीची व खानापूरहून परीश्वाडकडे जाणाऱ्या नागुर्डा गावच्या युवकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने. हा अपघात झाला आहे. अपघात होताच गंभीर जखमी असलेल्या संजय येळ्ळूरला तात्काळ खानापूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. खानापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.