- करंबळनजीक रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर आणि नजीकच्या परिसरात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे खानापूर – नंदगड मार्गावरील करंबळ गावानजीक मोठे झाड कोसळले. सुदैवाने, यावेळी झाडाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेनंतर तासभराहून अधिक काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच करंबळ ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाड कापून रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम सुरू केले. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या एकत्रित प्रयत्नाने अखेर रस्ता मोकळा करण्यात आला आणि सुमारे दीड तासानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.