बेळगाव / प्रतिनिधी

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी लोकसभा २०२४ निवडणुकांवेळी शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी असलेल्या परवाना बंदूक सरकारी नियमांनुसार खानापूर शहर पोलिस ठाण्यात जमा केल्या होत्या, परंतु सदर बंदूका अद्याप शेतकऱ्यांना परत करण्यात आलेल्या नाहीत. याची कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली, याचवेळी बेळगांवचे एसपी कळसा-भांडुरा प्रकल्पाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चा संदर्भात बंदोबस्तासाठी हजर होते, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपींना खानापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बंदूका देऊ केल्या नाहीत त्यांची तात्काळ परत कराव्यात अशा सूचना केल्या, त्याप्रमाणे खानापूर पोलिस स्टेशनलाही कळविण्यात आले. त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात पिकविण्यात येणारी गिड्डी लाल मिरची मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली आहे, सदर नुकसानीचा रीतसर पंचनामा करून खानापूर तालुका कृषी अधिकार्यांना संबंधित रिपोर्ट तयार करून देण्याचे आदेश दिले. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील तसेच घरातील लाल गिड्डी मिरचीचे नुकसान संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.