बेंगळूर : बेंगळुरू संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजय परेड काढण्यात येणार असताना बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात कर्नाटक सरकारने कारावाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायल चॅलेंज बंगळूरु (आरसीबी) आणि कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्थेच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) सचिव ए.शंकर आणि कोषाध्यक्ष ई.एस. जयराम यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सांगितली जात आहे. चेंगराचेंगरीच्या संदर्भात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात केएससीए आणि आरसीबीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत.