• लक्ष्मीकांत कांबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील लक्ष्मीकांत कांबळे यांनी मुलगी कृतिका हिचा पाचवा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसासाठी करण्यात येणारा खर्च टाळून माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंडित नेहरू पी. यु. कॉलेजची विद्यार्थिनी यशोदा कणबरकर हिची एक वर्षाची कॉलेज फी भरून सहकार्य केले. याबद्दल प्राचार्य एम. एच. पवार आणि माधुरी जाधव फाउंडेशनच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव (पाटील) यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी विद्यार्थिनी यशोदा कणबरकर हिने बारावी परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल लक्ष्मीकांत कांबळे आणि माधुरी जाधव (पाटील) यांचे आभार मानले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना लक्ष्मीकांत कांबळे म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून समाजाप्रती ओढ असलेल्या भावनेतून होतकरू विद्यार्थिनीला मदत केली. आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये असे मला वाटते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सचिव प्रकाश नंदिहळळी, प्रा. स्मिता यांच्यासह पंडित नेहरू पी. यु. कॉलेजचे इतर शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.