- महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माजी महापौर निलिमा चव्हाण, दिपाली दीपक दळवी, कॉ. कृष्णा मेनसे तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले कर्नाटक शासनाने डॉ. गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरवात केली. त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या वतीने सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. 1 जून 1986 रोजी मा..शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नमा चौकात दाखल झाले आणि त्यांनी सत्याग्रह केला. महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगाव बंदी असून देखील सत्याग्रह यशस्वी झाल्याने प्रशासनाने शरद पवाराना अटक केली, ही बातमी सर्वदूर सीमाभागात पसरली लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागली बेळगावात हरताळ पाळला गेला, परिस्थिती स्पोटक बनली, आंदोलकांवर गोळीबार झाला या गोळीबारात नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आले. शिवाय कित्येक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाचीया सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहाणे गरजेचे आहे.
यावर्षी रविवार दिनांक १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष गुंडू कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, अश्वजीत चौधरी, आकाश भेकणे, निखिल देसाई, प्रवीण धामणेकर, रितेश पावले, विकास भेकणे, आदी उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.