• लंडन येथील समारंभात प्रदान : पुरस्कार मिळविणाऱ्या कन्नडमधील पहिल्या लेखिका

बेंगळूर / प्रतिनिधी

ज्येष्ठ कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘हसीना मत्तू इतर कथेगळू’ (हसीना आणि इतर कथा) या लघुकथा संग्रहाचा अनुवाद केलेल्या ‘हार्ट लॅम्प’साठी हा पुरस्कार मिळाला आहे. बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या कन्नड भाषेतील त्या पहिल्या लेखिका ठरल्या आहेत.

बानू मुश्ताक यांनी 1990 ते 2023 दरम्यान लिहिलेल्या कथांचा समावेश असलेले हार्ट लॅम्प हे दक्षिण भारतातील मुस्लिम महिलांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे चित्रण आहे. हे पुस्तक सहा आंतरराष्ट्रीय अंतिम स्पर्धकांमधून निवडले गेले. त्यांच्या ‘हसीना मत्तू इतर कथेगळू’ या मूळ कन्नड कथासंग्रहाचा कोडगू जिल्ह्याच्या मडिकेरी येथील दीपा बस्ती यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे हा सन्मान जिंकणारा पहिला लघुकथा संग्रह आहे. मंगळवारी लंडन येथील समारंभात मूळ लेखिका आणि अनुवादक या दोघींना 50,000 पौंड (52.95 लाख रुपये) विभागून देण्यात आले.

बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहात दक्षिण भारतातील पितप्रधान समाजात राहणाऱ्या मुस्लीम महिलांना येणाऱ्या अडचणींचे मार्मिक चित्रण करण्यात आले आहे. त्यात 12 कथांचा समावेश आहे. मुळच्या हासन येथील बानू यांनी 1990 ते 2023 या कालावधीत 50 पेक्षा अधिक कथा लिहिल्या. दीपा बस्ती यांनी इंग्रजीत अनुवाद करताना त्यापैकी 12 कथा निवडल्या. दीपा बस्ती या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत. हार्ट लॅम्प हे तीन वर्षात बुकर पारितोषिक जिंकणारे दुसरे भारतीय पुस्तक आहे. यापूर्वी लेखिका गीतांजली श्री आणि अनुवादक डेझी रॉकवेल यांच्या ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’साठी 2022 बुकर पुरस्कार मिळाला होता.

  • मानवी अनुभवाच्या रचनेतील प्रत्येक धागा महत्त्वाचा !

2025 सालचा बुकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर बानू मुश्ताक म्हणाल्या, हा क्षण म्हणजे हजारो काजवे आकाशात एकाच वेळी चमकावेत असा वाटतो. मी हा सन्मान वैयक्तिक म्हणून नाही तर इतर अनेकांसोबत उठविलेला आवाज म्हणून स्वीकारते. कोणतीही कथा कधीही लहान नसते. मानवी अनुभवाच्या रचनेतील प्रत्येक धागा महत्त्वाचा असतो.

बालपणापासूनच बानू मुश्ताक यांना लेखनाची आवड होती. त्यामुळेच त्यांनी साहित्यिक जगात प्रवेश मिळविला. त्यांनी कथा, कादंबऱ्या आणि लेख लिहून कन्नड साहित्य क्षेत्रात योगदान दिले आहे. सामाजिक कार्यकर्त्या, पुरोगामी विचारवंत व पत्रकार म्हणूनही त्यांनी समाजाचे लक्ष वेधले आहे.