- ग्रामपंचायतीचा इशारा ; ग्राम स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे
कंग्राळी (खुर्द) / वार्ताहर
बेळगाव तालुक्याच्या कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकले असून गावात स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. तसेच गावातील रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. गाव स्वछतेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावात गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलित करणारी गाडी काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गावात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. परिणामी कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी कंग्राळी (खुर्द) ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत गावातील रस्त्यावर कोणीही कचरा फेकल्यास रु. ५००/- ते रु. १०००/- दंड आकारून कडक कारवाई करण्यात येईल, असा ठराव घेण्यात आला. त्यानुसार गावातील मुख्य रस्त्यावर तसेच मार्कंडेय नदीच्या काठावर टाकण्यात आलेला कचराही ग्रामपंचायतीने स्वच्छ करून सीसी कॅमेरे बसवले आहेत. यापुढे मुख्य रस्त्यावर कोणीही कचरा फेकू नये असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य महेश धामणेकर यांनी केले आहे.
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीमार्फत मुख्य मार्गावरील कचऱ्याची उचल केल्याने परिसराचा कायापालट झाला आहे. तेव्हा ग्रामस्थांनी सर्वत्र कचरा फेकू नये, तर दारात येणाऱ्या कचरा विल्हेवाटीच्या वाहनाला कचरा द्यावा. कचरा कुठेही फेकल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशांत पाटील व इतर सदस्यांनी दिला आहे.