बेळगाव / प्रतिनिधी
सदाशिवनगर येथे सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास गोवा पासिंगच्या एका कारने रस्त्यानजीक दुकानाजवळ पार्क केलेल्या ५ दुचाकी आणि १ मिनी गुड्स रिक्षाला जोरदार धडक दिली. यात तीन जण जखमी झाले असून सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, सदाशिवनगर मधील अंकुश शॉपसमोर सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास भरदा वेगाने आलेल्या इनोव्हा कारने दुकानासमोर उभ्या असलेल्या मिनी गुड्स रिक्षा आणि पाच दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की इनोव्हा थेट दुकानात घुसून थांबली. यामुळे वाहन मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रविवारी रात्री कॉलेज रोडवरील रुग्णालयासमोर एका गोव्याच्या इनोव्हा कारने तीन कार आणि एका दुचाकीला धडक दिली होती, त्यानंतर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.