• तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

चिक्कोडी / वार्ताहर

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.

हिप्परगी जलाशयातून कृष्णा नदीत ४०,००० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. कृष्णा नदीत २५,००० क्युसेकपेक्षा जास्त पाण्याची आवक आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नदीकडे जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुका प्रशासनाने कृष्णा नदी पात्रात हायअलर्ट जारी केला आहे. कोणालाही नदीवर जाऊ नये असे बजावण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे पंचगंगा नदीवर बांधलेले अनेक पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या परिसरातील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.