- एएसआय शंकर शिंदे यांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत, तेव्हा जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन सायबर क्राईमचे एएसआय शंकर शिंदे यांनी केले. शनिवारी, रविवारपेठ येथील बसवेश्वर बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलताना ते पुढे म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांनी नेहमीच स्ट्रॉंग पासवर्ड वापरावेत आणि अनेक वेबसाईटवर पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरण्याचे टाळावे.
ऑपरेटिंग सिस्टम आणि इंटरनेट सुरक्षा सॉफ्टवेअरसाठी अपडेटेड सॉफ्टवेअर खूप महत्वाचे आहे. सायबर गुन्हेगार नेहमीच तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सॉफ्टवेअरमधील कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून सावधगिरी बाळगा.
यावेळी सायबर क्राईम विभागाचे अधिकारी कडय्या करलिंगमठ म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व वैयक्तिक माहिती लॉक केली पाहिजे आणि सार्वजनिकरित्या कमी माहिती शेअर करणे उपयुक्त ठरेल. कोणत्याही परिस्थितीत, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सायबर क्राईमला बळी पडला असाल, तर सर्वप्रथम स्थानिक पोलिसांना माहिती द्या. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला वाटत असेल की गुन्हेगारांनी तुमची माहिती चोरली आहे, तर ज्या कंपन्या आणि बँकांमध्ये फसवणूक झाली आहे त्यांच्याकडे फसवणुकीची तक्रार करा आणि फसवणुकीचे अलर्ट दाखल करा आणि तुमचे क्रेडिट रिपोर्ट मिळवा असे ते म्हणाले.