• जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे निर्देश
  • आरोग्य विभागाची प्रगती आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांमुळे पसरणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी पंचायत राज विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित आरोग्य विभाग “राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाच्या” प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

‘होम हेल्थ’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मधुमेह आणि रक्तदाब (बीपी) साठी औषधांचा साठा आहे आणि या कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन औषधे वाटली जातात. बेळगाव जिल्ह्यात लवकरच हा कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमात स्तन , तोंड आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची तपासणी केली जाईल.

सर्व सार्वजनिक रुग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमधील ऑपरेशन रूम आणि शस्त्रक्रिया कक्ष सुसज्ज आणि व्यवस्थित ठेवण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. सार्वजनिक रुग्णालय रायबागमध्ये स्वच्छ पाण्याचा प्लांट उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.चिक्कोडी आणि गोकाक तालुक्यात लवकरच ‘मेगा आरोग्य मेळावे’ आयोजित केले जात आहेत असे ते म्हणाले.

बेंगळूर येथील पोषण आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा संचालनालयाच्या उपसंचालक डॉ. इंदिरा कबाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोषण केंद्रांमध्ये कमी वजनाच्या व कुपोषित बालकांवर उपचार करण्यात येत असून अशा बालकांवर उपचार करण्यात यावेत.

या बैठकीत उपसचिव (विकास) बसवराज अद्विमठ, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याणअधिकारी डॉ. एस. एस. गडेड, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदणी देव्हाडी, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, जिल्हा संसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. विवेक होन्नल्ली प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एस. ए. सायन्नावर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी व सार्वजनिक रुग्णालयाचे मुख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.