• शहापूर पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

हुलबत्ते कॉलनी येथे अवैधरित्या साठवून ठेवलेली १.३७ लाख रुपये किंमतीची गोव्यातून विविध कंपन्यामधील आणलेली दारू जप्त करून शहापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुभाष सुधीर डे (वय ४६, रा. महाद्वार रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याने शहापूर हुलबत्ते कॉलनीतील पहिला क्रॉस येथे नातेवाईकांच्या घरी दारू साठा ठेवला होता. गोव्यातून कमी किंमतीत दारू खरेदी करून बेळगाव जास्त किमतीत विकण्याच्या उद्देशाने हा साठा करण्यात आला होता.

याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त निरंजन अर्स, मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखाली नागराज ओसप्पागोळ, संदीप बगाडी, जगदीश हादिमनी, श्रीधर तलवार, श्रीशैल गाभी, सुरेश लोकुर, अजित शिपुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोड, विजय कामटे आदि कर्मचार्‍यांच्या पथकाने छापा टाकून गोवा राज्यातील विविध कंपन्यांची ३१३.३ लिटर दारू आणि इतर साहित्य जप्त केले.

ही कारवाई शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाली असून याप्रकरणी आरोपीवर शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल शहर पोलीस आयुक्तांनी कारवाई सहभागी झालेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.