हुबळी / वार्ताहर
पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे हुबळी शहरात प्रक्षोभ निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
पोलिसांच्या गोळीबारात आरोपी रक्षित कांती ठार झाला. या प्रकरणासंदर्भात पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याच्या छातीत गोळी लागली आणि तो जागीच मरण पावला.
दरम्यान, या घटनेत एक पीएसआय आणि दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आश्वासन देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली.