विजयपूर / दिपक शिंत्रे
प्रत्येकाने जर सदमार्गावर जीवन जगले, तर कोणतीही रोग येणार नाहीत आणि त्यावर नियंत्रणही शक्य आहे, असे अपर जिल्हाधिकारी सोमलिंग गेन्नूर यांनी सांगितले.विजयपूरमधील संत अन्नम्मा चर्चच्या सभागृहात कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंध संस्था, बेंगळुरु, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, विजयपूर, जिल्ह्यातील एआरटी आणि आयसीटीसी केंद्रे आणि समर्पणा विकास संस्था, सिंधनूर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही बाधित वधू-वरांच्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
गेन्नूर म्हणाले की, अलीकडे अनेक आजार आढळून येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरुकतेसह सकारात्मक मनोवृत्ती विकसित करणे गरजेचे आहे. विजयपूर जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांसाठी आयोजित करण्यात आलेले हे संमेलन अभिमानास्पद आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा कार्यक्रमांमुळे एक सुंदर जीवन घडवता येते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ. शिवानंद मास्तिहोळी म्हणाले, “एचआयव्ही बाधित हे अस्पृश्य नाहीत. मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम झाले पाहिजे. गेल्या २५ वर्षांपासून अनेक बाधितांना मी पाहिले आहे. मी कार्यरत असलेल्या रुग्णालयांतील एआरटी व आयसीटीसी केंद्रांमध्ये येणारे रुग्ण खूपच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. संमेलनात सहभागी वधू-वरांनी स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. योग्य काळजी घेतल्यास आरोग्यपूर्ण जीवन शक्य आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मल्लनगौड बिरादार होते. त्यांनी सांगितले की, दरवर्षी आमचा विभाग जिल्ह्यातील संघटनांच्या सहकार्याने वधू-वर संमेलनाचे आयोजन करतो. याचा अनेक एचआयव्ही बाधितांना मोठा फायदा झाला आहे. आमच्या जिल्ह्याचे कार्य इतर जिल्ह्यांतील लोकांनाही कौतुकास्पद वाटते. अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाईल आणि राज्यातील बाधितांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर पीठर अलेक्झांडर, पूजा टेलिव्हिजनचे मालक विजयकुमार चव्हाण अनौपचारिक संस्थेचे केव्हीएन पाधर, समर्पणा संस्थेचे प्रकल्प संचालक रामदास, एआरटी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सनदी, डॅको जिल्हा पर्यवेक्षक बाबुराव तळवार, जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ समुपदेशक रवी कित्तूर, संपर्क कार्यकर्त्यांच्या प्रकल्पाचे जिल्हा संसाधन व्यक्ती विजयकुमार कांबळे आदी उपस्थित होते.