खानापूर / प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली आणि पलटी झाली. खानापूर – नंदगड मार्गावर हेब्बाळ गावानजीक झालेल्या या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, अथणी येथील निधी कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय कुक्के सुब्रमण्य स्वामी देवस्थानला भेट देऊन परत येत असताना खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावाजवळ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला धडकल्याने ही घटना घडली. सदर अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेच कारमधील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी बेळगावला पाठवण्यात आले आहे. याचवेळी खानापूरचे माजी आमदार आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हेब्बाळमधील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेमधून तातडीने रुग्णालयात पाठवले.