- पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
रिंगरोड आणि हलगा मच्छे बायपासचे काम रेंगाळले असले तरी या रस्त्यांची कामे होतील. बेळगावचे ‘बृहन्मबेळगाव’ होण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षे हवीत, टप्प्याटप्प्याने विकास कामे केली जात आहेत. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत उभारण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
सोमवारी बुडा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘बृहन्मबेळगाव’ चे स्वप्न साकार होण्यासाठी दोन ते तीन वर्षे हवीत. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, फ्लायओव्हर, रेल्वे, बसस्थानक, विमानतळ, त्याचबरोबर शहरातील उद्योग वाढले पाहिजेत. औद्योगिक वसाहतीसाठी जागा आवश्यक नाही. जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. कणबर्गी योजनेसह उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने केली जातील. नोव्हेंबर महिन्यात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाचा शुभारंभ केला जाईल.
सध्या कार्यरत असलेल्या उपनोंदणी कार्यालयाच्या आवारात बांधकाम करून त्यानंतर जिल्हा सीईएन – पोलीस स्थानकांच्या इमारतीचे बांधकाम, त्यानंतर तालुका पंचायत इमारत जागेत बांधकाम केले जाणार आहे. तेथील कार्यालय इतरत्र हलविण्यात यावे, यासाठी संबंधितांना नोटीस दिली आहे. तीन टप्प्यात ही कामे केली जाणार आहेत. सीबीटी आणि आरटीओ कार्यालयाचे लवकरच लोकार्पण केले जाणार असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी १०० रुपयांच्या बॉण्डवर जागा खरेदी करून घर बांधलेल्यांनाही आता ई – आस्थीअंतर्गत नोंद करून घेऊन बी खात्याचे वितरण केले जाणार आहे. रिंगरोड आणि हलगा मच्छे बायपास रस्त्यांच्या कामाला विलंब झाला असला तरी रस्त्यांची कामे पूर्ण होतील. उन्हाळ्यात कोयना जलाशयातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र सरकारकडे विनंती करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
- डीसीसी बँकेच्या निवडणुकीत राहुल जारकीहोळी एंट्री करणार?
डीसीसी बँकेच्या निवडणुकीत राहुल जारकीहोळी एंट्री करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर याबाबत पक्षनेते आणि पतसंस्थांसोबत चर्चा सुरू आहे, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजू सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह बुडा सदस्य व अधिकारी उपस्थित होते.