बेळगाव / प्रतिनिधी
हनगल मार्गे मुंबईच्या बाजारात जात असताना, चालकाने प्रसंगावधान दाखवत एका स्लीपर बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुभाजकाला धडकून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंटेनर आणि त्यातील सुमारे १० ते १२ लाख रुपये किमतीच्या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुबळी-हनगलहून मुंबईकडे जाणारा आंब्यांनी भरलेला एक कंटेनर हलगा सिमेंट गोडाऊन समोर पलटी झाला. समोरून येणाऱ्या एका स्लीपर बसला चुकवण्यासाठी चालकाने कंटेनरला दुभाजकाच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगामुळे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि तो दुभाजकाला धडकून पलटी झाला.

या अपघाताबाबत बोलताना, हनगलहून मुंबईच्या दिशेने आंब्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाने सांगितले की, रविवारी महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची मोठी गर्दी असते. वेगाने येणाऱ्या स्लीपर बसला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा कंटेनर नियंत्रणाबाहेर गेला आणि दुभाजकाला धडकला. चालकाने सांगितले की, स्लीपर बसमध्ये अनेक प्रवासी होते, तर कंटेनरमध्ये तो आणि क्लीनर असे दोघेच होते. जर कंटेनरची धडक स्लीपर बसला बसली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. अपघाताच्या वेळी कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे भरलेले होते, ज्याची किंमत सुमारे १० ते १२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पलटी झाल्यामुळे कंटेनरमधील आंबे रस्त्यावर विखुरले आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच, कंटेनरचेही मोठे नुकसान झाले असून, ते जवळपास २२ ते २५ लाख रुपयांचे असल्याचे कंटेनरचालकाने सांगितले.

चालकाने आपल्या जीवाची पर्वा न करता स्लीपर बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले, याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. मात्र, या अपघातात त्याच्या कंटेनरचे आणि त्यातील आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीची भरपाई कोण करणार, असा प्रश्न चालकाने उपस्थित केला आहे.