विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्यातील मनगुळी येथील कॅनरा बँकेच्या शाखेत झालेल्या चोरीच्या प्रकरणाबाबत पोलिसांनी आज अधिकृत माहिती दिली असून तब्बल ५३ कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी करून आरोपी फरार झाले आहेत. तपासासाठी आठ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.

दि. २५ मे रोजी विजयपूर जिल्ह्यातील मनगुळी गावातील केनरा बँकेच्या शाखेत झालेल्या चोरीच्या प्रकरणाची आज पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. ही माहिती ऐकून ग्राहक थक्क झाले आहेत आणि त्यांना आता “आपल्या सोन्याचे काय?” अशी चिंता भेडसावत आहे. बँकेत ठेवलेले ५८ किलो ९७५ ग्रॅम सोने आणि ५.२० लाख रुपये रोख चोरीला गेले आहेत. चोरीनंतर उरलेल्या सोन्याची आणि चोरी गेलेल्या मालाची यादी करून आज ती माहिती जाहीर करण्यात आली.

पोलिसांना दिलेलेल्या माहितीनुसार, ही चोरी ६ ते ८ जणांच्या टोळीने केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी ८ विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे. तपासात अनेक गोष्टी समोर आल्या असून आरोपींचा शोध सुरु आहे. दोन दिवस योजना आखून ही चोरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच बँकेतील लॉकर्स उघडण्यासाठी बनावट चाव्यांचा वापर करण्यात आल्याचंही तपासात स्पष्ट झाले आहे.

प्रथम मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून चोर बँकेत घुसले, त्यानंतर सायरन बंद करून लॉकर्स उघडण्यासाठी बनावट चाव्यांचा वापर केला. एका लॉकरमधील सोनं चोरले गेले असून दुसऱ्या लॉकरमधील सोने तसेच सोडून दिले गेले आहे, हेही तपासात समोर आले आहे. बँकेविषयी संपूर्ण माहिती असलेल्याच व्यक्तींनी हा गुन्हा केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. चोरी झालेल्या शाखेतील खिडकी फोडण्यात आली असून, काळ्या रंगाच्या बाहुलीची पूजा करून तपास दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या चोरीच्या शोध घेण्यासाठी आठ पथके वेगवेगळ्या बाजूंनी तपास करत आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या चोरीच्या प्रकरणांपैकी हे एक असून जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाला एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.