- मृत व्यक्ती खानापूर तालुक्यातील बलोगा गावचा रहिवासी
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावच्या हद्दीत एम. के. हुबळी मार्गावर रस्त्यानजीक असलेल्या इराप्पा जोळद यांच्या शेतवडीत, शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय ४८, रा. बलोगा ; ता.खानापूर) याचा मंगळवार दि. १ एप्रिल रोजी रात्री हत्या झाली आहे. याबाबत त्याचा भाऊ सन्नगौडा इरनगौडा पाटील याने खानापूर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दास्तीकोप या ठिकाणी श्री लक्ष्मीची यात्रा सुरू असून, हत्या झालेला शिवनगौडा पत्नी व मुलांसह मेव्हणीच्या घरी लक्ष्मी यात्रेसाठी आला होता. परंतु मंगळवारी रात्री शिवनगौडा आपल्या पत्नीला व नातेवाईकांना आपल्या बलोगा गावाकडे जाऊन येतो असे सांगून गेला होता. परंतु तो घरी पोहोचलाच नाही. सकाळ झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
काल मंगळवारी रात्री कोणीतरी अज्ञात आरोपींनी शिवनगौडा याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या डोक्यावर व डाव्या बाजूच्या कानावर दगडाने ठेचल्याचे दिसून आले आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहावर खानापूर येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय एल.एच. गवंडी व पीएसआय एम.बी. बिरादार पुढील तपास करीत आहेत.