- अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला पतीचा काटा
- प्रियकराची साथ ; पोलीस तपासात सत्य उघड
खानापूर / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावच्या हद्दीत एका शेतवडीत घडलेल्या हत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावात दोन दिवसांपूर्वी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी २४ तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस तपासात हत्ये मागचे कारण स्पष्ट करत या मागे मृत व्यक्तीची पत्नी आणि आपले अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले. शिवनगौडा ईरणगौडा पाटील नामक व्यक्तीची गेल्या दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. याप्रकरणी तपासाची गती वाढवत पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला कलबुर्गी येथून अटक केली होती. मृत शिवनगौडा पाटील यांची पत्नी शैला पाटील हिचे रुद्रप्पा शिवपुत्र होसट्टी (रा. बीडी ता. खानापूर) या इसमाशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळताच शिवनगौडा याने पत्नीला जाब विचारायला सुरुवात केली. या कारणामुळे तणाव वाढत गेला आणि अखेर या दोघांनी मिळून शिवनगौडाचा काटा काढण्याचा कट रचला.
बलोगा ते पारिश्वाड रस्त्यावर शिवनगौडाला पार्टीसाठी घेऊन गेले आणि तिथे दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर रुद्रप्पा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कलबुर्गी येथे शोध लावून अटक करून हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी शिवनगौडाची पत्नी शैलालाही अटक करण्यात आली असून, खानापूर पोलिसांनी तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.