• आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने आयोजन

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ मे रोजी सकाळी ११ वाजता गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेज येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील २६ नामांकित कंपन्या सहभागी होत असून ५०० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. घराजवळच रोजगार मिळावा या हेतूने चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील तरुणांसाठी ही संधी सुवर्णमोलाची ठरणार आहे.

रोजगारासाठी आलेल्या कंपन्यांमध्ये फॉर्च्युन इंजिनिअरिंग, पारले प्रॉडक्ट्स, अ‍ॅक्सिस बँक, महालक्ष्मी फूड्स, मेटलमॅन ऑटो, व्हिजन कंप्युटर इन्स्टिट्यूट, गंगामाई डेअरी, एस. के. एग्रो, कोल्हापूर ऑटो वर्क्स, संगमनेर एग्रीटेक यांसारख्या नामांकित उद्योगसमूहांचा समावेश आहे.

या मेळाव्यात १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर आणि इंजिनिअरिंग पदवीधारक तरुण-तरुणींसाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये प्रॉडक्शन, मशीन ऑपरेटर, हेल्पर, सुपरवायझर, मार्केटिंग, टेलीकॉलर, अकाउंटिंग, ऑफिस असिस्टंट, सेल्स यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

याशिवाय, सुशिक्षित तरुण तरुणींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता छोटे मोठे उद्योग सुरू करावेत यासाठी कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत मार्गदर्शन, तसेच परदेशी शिक्षण व नोकरी संधीबाबत स्वतंत्र कक्ष कार्यरत असणार आहे.

“बेरोजगारीमुळे नोकरीसाठी इतरत्र वणवण करण्याची वेळ आता येणार नाही. आपल्या मतदारसंघातील तरुणांना घराजवळच रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी हा रोजगार मेळावा आयोजन केले आहे. प्रत्येक तरुण-तरुणीने या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा (CV) सह हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ : www.rojgar.mahaswayam.gov.in