- ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती ; बचावकार्य सुरू
दिल्ली : दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात शनिवारी पहाटे एक चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एन डी आर एफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त संदीप लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दहा लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र आठवाल यांनी सांगितले की, रात्री २.५० वा. इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले किंवा संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली होती. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर आम्ही तात्काळ बचाव कार्य सुरू केले. एनडीआरएफ, दिल्ली पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणा बचाव कार्यात सहकार्य करत आहेत.