• मालकासह आठ जणांचा मृत्यू
  • तब्बल पंधरा तासांनंतर आगीवर नियंत्रण

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्यात रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात तब्बल ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ज्या लोकांना कारखान्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचा मुलगा, त्याची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, अक्कलकोट एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यात पहाटे ५.३० वा. सुमारास तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. सेंटर इंडस्ट्रीजचे मालक आगीत अडकल्याने त्यांना शोधण्यासाठीची मोहीम पहाटेपासून सुरु होती. सर्वजण मास्टर बेडरूममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडला आले नाही. श्वास गुदमरुन आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. आगीमध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यात कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, मालकाचा मुलगा अनस मन्सूरी (वय २५), त्याची पत्नी शिफा (वय २४) आणि त्याचा एका वर्षाचा मुलगा युसुफ यांचा समावेश आहे.