बैलहोंगल / वार्ताहर

अवघ्या तीन वर्षाच्या बालकाला त्याच्याच पित्याने जळत्या लाकडाने मारल्यामुळे त्या बालकाचा मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्प येथे घडली आहे. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात आपल्याच मुलाला मारहाण केली. चुलीवरील लाकडाचा तुकडा डोक्यात, हातावर आणि छातीत मारल्याने तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेतील पित्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे अमानुष्य कृत्य केल्याचे सांगण्यात आले.
हत्या झालेल्या मुलाचे नाव कार्तिक मुकेश (३) असे आहे. हे कुटुंब मूळचे बिहारचे आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्या रागातून स्वयंपाक करत असताना पतीने चुलीतून लाकडाचा तुकडा घेतला आणि मुलाच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर मारला, ज्यामुळे मुलगा जागीच मरण पावला. डीवायएसपी डॉ. वीरैया हिरेमठ, नेसरगी सीपीआय गजानन नाईक आणि पीएस वाहिद यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुरगोड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.