• चिगुळे येथील घटना

खानापूर / प्रतिनिधी

अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. चिगुळे (ता.खानापूर) येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. विलास हेमाजी चिखलकर (वय ५५) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, विलास चिखलकर रविवारी सकाळी गावाजवळील शेताकडे गेले असता, विश्रांतीसाठी ते झोपडीत गेले. पण तेथे एक अस्वल आणि त्याची दोन पिले होती. परंतु त्यांना याची कल्पना आली नाही. झोपडीत प्रवेश करताच अस्वलाने आपल्या पिलांसह त्यांच्या दिशेने हल्ला केला. शेतकऱ्याने बचावासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वलाच्या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत चिखलकर घराकडे परतत असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना पाहिले आणि तातडीने मदत केली. त्यांना त्वरित बेळगाव जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनखात्याने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.